लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2019
*मतदान केंद्रावर मतदारांना* *मिळणार मुलभूत सुविधा*
- उपजिल्हा निवडणूक अधिकारी महादेव किरवले
परभणी, दि. 1 :- भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानूसार जिल्ह्यातील मतदारांना मतदान केंद्रावर स्वच्छ पिण्याचे पाणी, शौचालय, दिव्यांगांसाठी व्हिलचेअर व रॅम्प, आदि मुलभूत सुविधा पुरविण्यात येणार असल्याची माहिती उपजिल्हाधिकारी तथा उपजिल्हा निवडणूक अधिकारी महादेव किरवले यांनी बैठकीत दिली.
जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन समिती सभागृहात मतदान केंद्रावरील मुलभूत सोयी-सुविधाविषयीची आढावा बैठक आयोजित करयात आली होती. याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी शिक्षणाधिकारी श्रीमती वंदना वाव्हुळ, उपशिक्षणाधिकारी श्री.सलगर, स्काऊट गाईडचे प्रतिनिधी यांची प्रमुख उपस्थिती होती.
पुढे बोलतांना उपजिल्हा निवडणूक अधिकारी श्री.किरवले म्हणाले की, लोकशाही बळकट करण्यासाठी प्रत्येकाने मतदान करणे आवश्यक असून प्रत्येक मतदाराला मतदान करता यावे यासाठी प्रशासनाकडून विशेष सोय करण्यात येत आहे. तसेच दिव्यांग मतदाराला मतदानासाठी मतदान केंद्रापर्यंत आणल्यानंतर व्हिलचेअरच्या माध्यमातून त्यांना मतदान कक्षात प्रवेश देता येईल यासाठी प्रयत्नशील राहावे. असे सांगून स्काऊट गाईडच्या 18 वर्षाखालील विद्यार्थ्यांना मतदान केंद्रावर स्वयंसवेक म्हणून नेमण्यात येणार असून त्यांनी दिव्यांग, ज्येष्ठ नागरिकांना मतदान केंद्रापर्यंत पोहोचविण्यासाठी मदत करणार आहेत. त्यांना तेथे नियुक्त असलेल्या चतुर्थ श्रेणी कर्मचारीही मदत करेल. उन्हाळा असल्यामुळे मतदान केंद्रावर सावली राहण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात येणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. तसेच स्काऊट व गाईडच्या विद्यार्थ्यांनी गणवेशात मतदान केंद्रावर उपस्थित रहावे असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. उपस्थित शाळांच्या मुख्याध्यापकाकडून विचारण्यात आलेल्या प्रश्नांचे समाधानही त्यांनी यावेळी केले.
शिक्षणाधिकारी श्रीमती वाव्हुळ म्हणाल्या की, प्रत्येक मतदान केंद्रावर तात्पूरती रॅम्पची व्यवस्था करण्यात यावी तसेच मतदारांना मतदानासाठी प्रोत्साहित करण्यासाठी विविध स्पर्धांचे आयोजन करावे. तसेच विद्यार्थ्यांच्या माध्यमातून त्यांच्या पालकांचे मतदान करणार असल्याचे शपथपत्रही भरून घेण्यात येणार आहे. स्काऊट व गाईडच्या मुलांना 18 एप्रिल रोजी शक्यतो ते राहत असल्याच्या घरापासून जवळच्या मतदान केंद्रावर सेवा देण्यात येणार आहे असेही त्यांनी यावेळी सांगितले.
यावेळी स्वीपच्या सदस्यांनी एक पात्री प्रयोगातून मतदानाचे महत्व उलगडले. या बैठकीस शाळेतील मुख्याध्यापक, शिक्षक, संबंधित कर्मचारी यांच्यासह स्काऊड गाईडचे मार्गदर्शक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा