बुधवार, २७ मार्च, २०१९

एमसीएमसी समितीने माध्यमातील जाहिराती बरोबरच पेडन्यूज वरही विशेष लक्ष ठेवावे -जिल्हाधिकारी पी. शिवशंकर

*एमसीएमसी समितीने माध्यमातील जाहिराती बरोबरच पेडन्यूज वरही विशेष लक्ष ठेवावे*

-जिल्हाधिकारी पी. शिवशंकर


परभणी ,दि.२७:- जिल्हास्तरीय माध्यम प्रमाणीकरण व सनियंत्रण समितीने विविध प्रसारमाध्यमांतून प्रसिद्ध होणा-या

राजकीय पक्ष व उमेदवारांच्या जाहीरातीबरोबरच  मुद्रीत व इलेक्ट्रॉनिक  माध्यमातील  उमेदवार  व राजकीय  पक्षाबाबत  आलेल्या वृत्त, विशेष वृत्त व लेख अदि मजकूराची तपासणी  करुन  त्यातील पेडन्यूज  वर बारकाईने लक्ष ठेवावे, असे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी पी. शिवशंकर  यांनी  सूचित केले.

जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित  जिल्हास्तरीय माध्यम प्रमाणीकरण व सनियंत्रण समितीच्या बैठकीत  जिल्हाधिकारी बोलत होते. यावेळी उपजिल्हा निवडणूक  अधिकारी महादेव किरवले, समिती सदस्य सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी श्रीमती सुचिता शिंदे, आकाशवाणी केंद्राचे संचालक  बगाटे, प्राध्यापक डॉ सुधीर इंगळे, जिल्हा माहिती अधिकारी अनिल आलुरकर आदि उपस्थित होते.

जिल्हाधिकारी म्हणाले की,भारत निवडणूक  आयोगाच्या  निर्देशाप्रमाणे  मुद्रीत, इलेक्ट्रॉनिक व समाजमाध्यमावर पसिध्द करण्यासाठी   राजकीय पक्ष  व उमेदवारांच्या  जाहिरातीचे  पूर्वप्रमाणीकरण जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी व सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या द्विसदस्यीय समितीच्या मार्फत  केले जाईल . त्याप्रमाणेच  मुद्रीत , इलेक्ट्रॉनिक माध्यमातील  जाहिरातीच्या स्वरुपातील  व मोबदला  देऊन प्रसिध्द केलेल्या बातम्यांची  तपासणी करुन  संशयित  पेड न्यूज  वर बारकाईने लक्ष ठेवावे. व त्या पेडन्यूज असल्याचे  आयोगाच्या मार्गदर्शक सूचनाप्रमाणे  सिध्द होत असेल तर संबंधित  उमेदवारांना  नोटीस  देण्याबरोबरच  पेड न्यूज  वरील तो खर्च संबंधित  उमेदवारांच्या निवडणूक  खर्चात  नोंद  करण्याबाबत  निवडणूक खर्च समितीला कळविले पाहीजे, असे जिल्हाधिकारी यांनी सांगितले. 

नोंदणीकृत  राष्ट्रीय  अथवा राज्यस्तरावरील  पक्ष आणि निवडणूक  लढविणाऱ्या  प्रत्येक उमेदवारांनी इलेक्ट्रॉनिक माध्यमातून जाहिरात प्रसारित करण्याच्या पूर्वी  किमान  3 दिवस  आधी जाहिरात प्रमाणीकरणासाठी  अर्ज करावा.तसेच बिगर  नोंदणीकृत  राजकीय पक्ष  अथवा  अन्य व्यक्तींनी जाहिरात प्रसारित  करण्यापूर्वी  किमान  7 दिवस आधी  अर्ज करणे  आवश्यक आहे. सदरील विहित वेळेत प्रमाणीकरणासाठी  आलेल्या जाहिराती 48 तासांच्या  आत प्रमाणीत  करुन  देण्याची  जबाबदारी  समितीची  असल्याचे जिल्हाधिकारी यांनी  सांगितले.

प्रत्येक राजकीय  पक्ष व उमेदवारांनी  प्रसारमाध्यमांतून प्रचार, प्रसिध्दी  करण्यासाठी  जाहिरातीचे पूर्व  प्रमाणीकरण  घेणे  अत्यंत आवश्यक  आहे. तसेच  प्रसारमाध्यमांनीही राजकीय, पक्ष व  उमेदवारांच्या प्रसिध्दीसाठी  आलेल्या जाहिराती  एमसीएमसी  समितीकडून  प्रसारणाचे  प्रमाणपत्र मिळाल्याची  खात्री  करावी व  त्यानंतरच  जाहिराती  प्रसिध्द  कराव्यात व निवडणूक  विभागाला  निर्भिड, मुक्त  व नि:पक्ष वातावरणात  निवडणुका  घेण्यासाठी  सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी यांनी केले. यावेळी माध्यम प्रमाणीकरण समितीच्या कार्यपध्दतीबाबत  मार्गदर्शन केले. 

प्रारंभी समितीचे सदस्य सचिव  जिल्हा माहिती अधिकारी आलुरकर यांनी समितीच्या कामकाजाबाबत व कार्यपद्धतीबाबत माहिती  दिली.

****

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

लॉकडाऊन हळूहळू शिथील करा खासदार,आमदारांनी घेतली जिल्हाधिकार्‍यांची भेट

लॉकडाऊन हळूहळू शिथील करा खासदार, आमदारांनी घेतली जिल्हाधिकार्‍यांची भेट परभणी,दि.08(प्रतिनिधी)कोरोना विषाणु संसर्गामुळे गेल्या दीड महिण्यापा...