लोकसभा निवडणूक आचारसंहितेचे
काटेकोर पालन करावे
- जिल्हाधिकारी पी.शिवशंकर
सार्वत्रिक निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर परभणी जिल्ह्यातील सर्व कार्यालय प्रमुखाची बैठक जिल्हाधिकारी पी.शिवशंकर यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात घेण्यात आली. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी पृथ्वीराज बी.पी., पोलिस अधिक्षक कृष्णकांत उपाध्याय, मनपा आयुक्त रमेश पवार, निवासी उपजिल्हाधिकारी अंकुश पिनाटे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी महादेव किरवले, उपजिल्हाधिकारी सुकेशिनी पगारे, यांच्यासह विविध विभागाचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.
भारत निवडणूक आयोगाने निवडणूक आचार संहितेचे पालन करण्यासंदर्भात दिलेल्या निर्देशांची माहिती यावेळी देण्यात आली. जिल्ह्यात आचारसंहिता अंमलबजावणीपूर्वी कार्यादेश दिलेल्या व काम सुरु झालेल्या तसेच काम सुरु न झालेल्या प्रकरणांची माहिती विहित नमुनयात प्रशासनाला सादर करण्यात यावे. कोणत्याही नवीन कामांना मंजूरी देता येणार नाही. सुरु असलेल्या कामांना पुढे चालु ठेवण्यास हरकत नाही. यासंदर्भात काही मार्गदर्शन हवे असल्यास संबंधित विभागाला सचिवस्तरावर पत्रव्यवहार करावा व त्याची प्रत जिल्हा निवडणूक अधिकारी यांना देण्यात यावी. आचारसंहिता लागू झाली असल्याने कोणत्याही प्रकारे मतदारांवर प्रभाव पाडणारी कृती होऊ नये असे सांगून जिल्हा निवडणूक अधिकारी पी.शिवशंकर यांनी सविस्तर मार्गदर्शन केले.
यावेळी विविध विभागाच्या प्रमुखांनी आचारसंहितेसंबंधी विविध प्रश्न मांडले. त्याचे निरसन यावेळी करण्यात आले.
यापूर्वी जिल्ह्यातील सर्व बँकांच्या शाखा अधिकाऱ्यांची बैठक घेऊन सुचना देण्यात आल्या. 1 लाख रुपयांपेक्षा जास्तीचे रोख व्यवहार आणि 10 लाख रुपयांपेक्षा जास्तीचे इतर प्रकारे व्यवहार झाल्या प्रकरणी दररोजचा अहवाल प्रत्येक बँक शाखेने निवडणूक कार्यालयास सादर करावा. याशिवाय निवडणूक उमेदवारांचे स्वतंत्र खाते उघडण्यास सहकार्य करावे. असे सांगून निवडणूक कामकाजात बँकांनी सक्रिय राहून सहकार्य करावे असे आवाहनही जिल्हा निवडणूक अधिकारी पी.शिवशंकर यांनी केले. यावेळी अग्रणी बँक अधिकारी सुनिल हट्टेकर आणि बँक अधिकारी उपस्थित होते.
याशिवाय जिल्हाधिकारी यांनी सर्व राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींची स्वतंत्र बैठक घेऊन निवडणूक आचारसंहितेबाबत सविस्तर मार्गदर्शन केले व निवडणूक कालावधीत आचार संहितेचे राजकीय पक्षांकडूनही काटेकोरपणे पालन करण्याचे आवाहन केले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा