शुक्रवार, २२ मार्च, २०१९

परभणी लोकसभा मतदारसंघात चौरंगी लढत होणार,मात्र वंचित बहुजन आघाडीच ठरवणार खाजदार कोण,आज ठरणार मेघना बोर्डीकर निवडणूक रिंगणात राहणार की माघार घेणार.

वंचित बहुजन आघाडी ठरवणार परभणीचा खाजदार.
लक्ष्मण उजगरे_परभणी लोकसभा मतदारसंघात चौरंगी लढत होणार असल्याची चर्चा सध्या मतदार संघात रंगत जरी असली पण येणारी लोकसभा मतदारसंघात खाजदार कोण होणार हे मात्र वंचित बहुजन महासंघच ठरवणार हे मात्र निश्चित आहे.
   कारण परभणी लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस/काँग्रेस पार्टीचे राजेश विटेकर तर शिवसेनेकडून संजय जाधव हे निवडणूक रिंगणात आहेत.त्याच बरोबर मेघना बोर्डीकर या अपक्ष म्हणून लोकसभा मतदारसंघात लढणार हे जवळजवळ निश्चित असल्याने शिवसेनचे मतदार फुटणार व त्यात संजय जाधव यांच्यावर नाराज असलेला गट देखील संजय जाधव यांच्या विरोधात काम करणार असल्याची चर्चा राजकीय जाणकारांचे मत आहे.म्हणुनच परभणी लोकसभा मतदारसंघाचा खाजदार वंचित बहुजन आघाडी ठरवणार हे मात्र निश्चित.
     परभणी जिल्हा हा काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जात होता. देशातील पहिली सार्वत्रिक लोकसभा निवडणूक 1951 व 1977 ची लोकसभा निवडणूक वगळता 1984 पर्यंत परभणी जिल्ह्यात काँग्रेस पक्षाचे प्राबल्य होते. परंतु 1989 पासून या जिल्ह्यातून काँग्रेस जवळपास हद्दपार झाली असून शिवसेनेने हा मतदारसंघ आपला बालेकिल्ला बनविला आहे. शिवसेनेच्या या विजयात अपक्षांचा मोलाचा वाटा आहे.
1989 साली स्व. बाळासाहेब ठाकरे यांनी महाराष्ट्रात झंझावात निर्माण करून नवे पर्व सुरू केले. या अगोदर शिवसेनेला पक्ष म्हणून मान्यताही नव्हती. 1989 साली पहिल्यांदाच बाळासाहेबांनी शिवसेनेच्या माध्यमातून आपले राजकीय अस्तित्व उभे केले. याच काळात त्यांनी परभणीत मोठी जाहीर सभा घेवून जनतेच्या मनात शिवसेनेबद्दल वेगळे अस्तित्व निर्माण केले. तेव्हापासून या जिल्ह्यात 1998 ची निवडणूक वगळता सातत्याने शिवसेना विजयी होत आली आहे. परंतु या विजयात प्रत्येक वेळी अपक्ष आणि इतर उमेदवारांचा सहभाग लाभला आहे.
1991 साली लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीत शिवसेनेने या जिल्ह्यात पुन्हा पदार्पण केले. त्यावेळी परभणी जिल्ह्यात जनता दलाने आपला उमेदवार निवडणूक रिंगणात उतरविला. यावेळी शिवसेनेकडून अशोकराव देशमुख, जनता दलाकडून प्रताप बांगर तर काँग्रेसकडून माणिकराव भांबळे यांच्यात लढत झाली. अतिशय अटीतटीच्या या लढतीत शिवसेनेला 143293, जनता दलाला 123132 तर काँग्रेसला 118209 मते मिळाली होती. वास्तविक जनता दल आणि काँग्रेस ही पूर्वी एकत्रच होती. परंतु वेगळे लढल्यामुळे त्याचा फटका काँग्रेस आणि जनता दलाला बसला. याशिवाय या निवडणुकीत शेतकरी कामगार पक्षासह एकूण 23 उमेदवार रिंगणात होते. यापैकी बरेच उमेदवार हे काँग्रेस पक्षाशी निगडीत होते. ही मते फुटल्यामुळे काँग्रेसला पराभव स्विकारावा लागला.
1996 मध्ये शिवसेनेकडून सुरेश जाधव तर काँग्रेसकडून अशोक देशमुख यांच्यात लढत झाली. यावेळी अशोक देशमुख यांनी शिवसेना सोडून काँग्रेस पक्षात प्रवेश केल्याने जनतेने चिडून त्यांच्याविरोधात कौल दिला. यावेळी सुरेश जाधव यांना 230762 तर अशोक देशमुख यांना 115887 मते मिळाली होती. यावेळी पहिल्यांदाच परभणी जिल्ह्यात समाजवादी पार्टीने आपला उमेदवार उतरविला होता. सपाचे उमेदवार राजेश पाटील गोरेगावकर यांना 55407 तर अपक्ष उमेदवार गणेशराव दुधवगावकर यांना 31674 मते मिळाली होती. राजेश गोरेगावकर आणि गणेशराव दुधगावकर हे पूर्वाश्रमीचे काँग्रेसवासीच होते. परंतु त्यांच्यात फूट पडल्यामुळे काँग्रेसला सहन करावा लागला. या निवडणूकीत 26 उमेदवारांनी आपले नशीब आजमावले होते.
1998 च्या सार्वत्रिक लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे सुरेशराव वरपूडकर हे 320415 मते घेवून विजयी झाले होते तर शिवसेनेचे सुरेश जाधव यांना 274922 मते मिळाली होती. या निवडणुकीचे वैशिष्ट्य म्हणजे या निवडणुकीत केवळ 5 उमेदवार रिंगणात असल्यामुळे काँग्रेसला हा विजय मिळविला आला होता.
1999 साली झालेल्या मध्यावधी निवडणुकीत जनतेच्या मनात काँग्रेसबद्दल रोष निर्माण झाला आणि भाजपने अबकी बारी अटलबिहारी हा नारा देत निवडणुक लढविली. या निवडणुकी अगोदर शरद पवार यांनी सोनिया गांधी यांच्या विरोधात स्वदेशी मुद्दा उपस्थित करून स्वतःच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. यामध्ये परभणी लोकसभा निवडणुकीत सुरेशराव वरपूडकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसकडून निवडणूक लढविली. या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस वेगवेगळी लढल्यामुळे त्याचा फटका काँग्रेसला बसला. शिवसेनेचे सुरेश जाधव 254019 मते घेवून विजयी झाले होते तर काँग्रेसचे रावसाहेब जामकर यांना 210354 मते व वरपूडकर यांना 179443 मते मिळाली होती. रावसाहेब जामकर आणि सुरेशराव वरपूडकर एकत्र लढले असते तर काँग्रेसचा विजय निश्‍चित होता.
2004 साली झालेल्या लोकसभा निवडणुकीत परभणी मतदार संघातून शिवसेनेचे तुकाराम रेंगे पाटील तर राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस आघाडीचे उमेदवार सुरेशराव वरपूडकर यांच्यात लढत झाली. यामध्ये रेंगे पाटील यांनी 339318 मते घेवून विजय मिळविला. तर सुरेशराव वरपूडकर यांना 283147 मतांवर समाधान मानावे लागले. सुरेशराव वरपूडकर यांना समाजवादी पार्टी आणि इतर अपक्षांनी फटका दिल्याने त्यांना पराजित व्हावे लागले. सपाचे गफार मास्टर यांनी 17736 मते तर अपक्ष उमेदवारांनीही बर्‍यापैकी मते घेतल्यामुळे वरपूडकरांना पराभव स्विकारावा लागला हेाता.
2009 साली झालेल्या निवडणुकीत पूर्वीचे काँग्रेसवासी असलेले गणेशराव दुधगावकर यांनी शिवसेनेकडून निवडणूक लढविली होती. तर राष्ट्रवादी काँग्रेसकडून सुरेशराव वरपूडकर हे रिंगणात होते. गणेशराव दुधगावकर यांनी 385387 मते घेवून विजय मिळविला हेाता तर सुरेशराव वरपूडकर यांना 319969 मते मिळाली होती. यावेळी बहुजन समाज पार्टीच्या वतीने जयश्री जामगे या निवडणुक रिंगणात होत्या. त्यांना 64615 मते मिळाली होती. या फुटीच्या मतामुळे वरपूडकर यांना पराभवाला सामोरे जावे लागले होते. याशिवाय अन्य 16 इतर उमेदवारांच्या मत विभागणीमुळे राष्ट्रवादी काँग्रेसला पराभव पत्करावा लागला होता.
2014 ही निवडणूक ऐतिहासिक ठरली. नरेंद्र मोदी यांनी सर्व देशभर झंझावात निर्माण करून एक भयंकर अशी लाट निर्माण केली. या लाटेत देशातील निवडणुकीचे चित्र बदलून गेले. त्याचा परिणाम परभणी लोकसभा मतदारसंघावरही झाला. या निवडणुकीत मोदी लाटेतही राष्ट्रवादी काँग्रेसचे विजय भांबळे यांनी शिवसेनेचे उमेदवार संजय जाधव यांना चांगलीच टक्कर दिली. शिवसेनेचे उमेदवार संजय जाधव हे 578455 मते घेवून विजयी झाली असले तरीही विजय भांबळे यांनी 451300 मते मिळविली होती. त्यांच्या पराभवात बहुजन समाज पार्टीच्या उमेदवारासह अन्य 18 उमेदवारांनी मोलाचा वाटा उचलला होता. आपसातील गटबाजी आणि अपक्षांचा सहभाग यामुळेच 1989 पासून ते 2014 पर्यंत काँग्रेसला आपल्याच बालेकिल्यात सातत्याने हार मानावी लागली आहे. 2019 साली होत असलेल्या निवडणुकीत किती उमेदवार रिंगणात येतात आणि काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसमधील गटबाजी किती प्रमाणात कमी होते यावर विजयाचे गणित अवलंबून आहेत. त्यातच मा. प्रकाश आंबेडकर यांची बहुजन वंचित आघाडी राष्ट्रवादी काँग्रेसला किती धोक्यात आणू शकते यावरही विजयाचे गणित अवलंबून आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

लॉकडाऊन हळूहळू शिथील करा खासदार,आमदारांनी घेतली जिल्हाधिकार्‍यांची भेट

लॉकडाऊन हळूहळू शिथील करा खासदार, आमदारांनी घेतली जिल्हाधिकार्‍यांची भेट परभणी,दि.08(प्रतिनिधी)कोरोना विषाणु संसर्गामुळे गेल्या दीड महिण्यापा...