परभणी जिल्ह्यात केवळ १.६० टक्के वनक्षेत्र; प्रशासनापुढे १ कोटी २० लाख वृक्ष लागवडीचे आव्हान
परभणी - यंदाच्या पावसाळ्यात परभणी जिल्ह्यात वृक्ष लागवडीचे मोठे उद्दिष्ट आहे. विशेष म्हणजे परभणी जिल्ह्यात केवळ १.६० टक्के एवढेच वनक्षेत्र आहे. जिल्हा प्रशासनापुढे आता मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण करून हा बॅकलॉक भरून काढण्याचे आव्हान आहे.

परंतू 'नेहमीच येतो पावसाला' या उक्तीप्रमाणे ही मोहीम राबविल्यास पुन्हा परभणीकराना दुष्काळाचा सामना करावा लागणार आहे, हे निश्चित. दरम्यान, परभणी जिल्ह्यात यंदा १ कोटी २० लाख वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट असून ते विविध विभागांना विभागून दिल्याची माहिती जिल्हाधिकारी पी. शिवशंकर यांनी दिली.महाराष्ट्र शासनाने यावर्षी ३३ कोटी वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट ठेवून कार्यक्रम हाती घेतला आहे. याअंतर्गत परभणी जिल्ह्यात १ कोटी १९ लाख ८ हजार वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. यासंदर्भात गुरुवारी सायंकाळी आयोजित पत्रकार परिषदेत जिल्हाधिकारी पी. शिवाशंकर यांनी माहिती दिली. यावेळी जिल्हा वन अधिकारी विजय सातपुते उपस्थित होते.जिल्हाधिकारी शिवाशंकर म्हणाले, 'परभणी जिल्ह्याला देण्यात आलेल्या उद्दिष्टांपैकी वन विभाग, सामाजिक वनीकरण, ग्रामपंचायत आणि इतर विभागांना हे उद्दिष्ट विभागून देण्यात आले आहे. या वृक्ष निर्मितीची जबाबदारी वन आणि सामाजिक वनीकरण विभाग आणि कृषी तसेच रेशीम विभागाला देण्यात आले होते. वन विभागाच्या एकूण ५९ रोपवाटिका जिल्ह्यात कार्यरत आहेत. यामध्ये प्रामुख्याने स्थानिक रोपांना महत्त्व देऊन वड, उंबर, पिंपळ, बोर, करंज, सीताफळ, शिशु, सिरस, कडुलिंब या प्रजातींच्या वृक्षांची निर्मिती करण्यात आली आहे. शासकीय यंत्रणे सोबतच सामान्य नागरिकांनी देखील या मोहिमेत सहभागी होऊन दुष्काळ आणि पाणीटंचाईवर मात करावी, असे आवाहन पी. शिवाशंकर यांनी केले. ही वृक्ष लागवडीची मोहीम 1 जुलै ते 30 सप्टेंबर अशी 92 दिवस असणार असल्याचेही त्यांनी सांगितले.प्रशासनाला मोठे आव्हान"दरम्यान, गेल्या काही वर्षातील परभणी जिल्ह्याची परिस्थिती पाहता, या ठिकाणी लोकांना कायम दुष्काळाचा सामना करावा लागतो. यास जिल्ह्यात कायम होणारी वृक्षतोड आणि नव्याने होत नसलेले वृक्षारोपण कारणीभूत असल्याचे वारंवार सांगितले जाते. याचा परिणाम परभणी जिल्ह्यात अल्प प्रमाणात वनक्षेत्र शिल्लक राहिले आहे. परभणी जिल्ह्याचे एकूण भौगोलिक क्षेत्र ६ लाख ४० हजार हेक्टर असून त्यापैकी केवळ १० हजार १४१ हेक्टरवर अर्थात १.६० टक्केच वनक्षेत्र आहे. चांगल्या वातावरणाच्या संतुलनासाठी ३३ टक्के क्षेत्रावर वृक्षाच्छादन असणे आवश्यक आहे. त्यामुळे परभणी जिल्ह्यात आणखी ३१.५० भूभागावर वृक्षारोपण करणे आवश्यक आहे. हे प्रचंड मोठ्या प्रमाणात आव्हान असून जिल्हा प्रशासन ते कसे पूर्ण करते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा