तरुणांकडून हरणाच्या पाडसाला जीवदान; वनविभागाच्या निष्काळजीपणामुळे उपचारासाठी उशीर
परभणी - जिल्ह्यातील पाथरी तालुक्यातील देवेगाव फाट्याजवळ तरुण शेतकऱ्यांनी हरणाच्या जखमी पाडसाची कुत्र्यांच्या तावडीतून सुटका केली. त्यानंतर वनविभागाला फोन केला. मात्र, तब्बल ४ तासानंतर वनविभागाला घटनास्थळी दाखल झाले. त्यामुळे वनविभागाने वन्यप्राण्यांबाबत दाखवलेल्या निष्काळजीपणाबाबत शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे.
सतीश गलबे आणि गजानन गलबे हे दोन शेतकरी शुक्रवारी सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास शेतात जात होते. त्यावेळी देवेगाव फाट्याजवळ काही कुत्रे एका हरणाच्या जखमी पाडसाचे लचके तोडत असल्याचे त्यांना दिसले. त्यांनी कुत्र्याच्या तावडीतून त्या तडफडणाऱ्या पाडसाची सुटका केली. त्यानंतर वनविभागाच्या अधिकाऱ्यांना फोन केला. मात्र, तुम्हीच घेऊन या असे सांगण्यात आले. शेतीची कामे असल्याने आम्ही येऊ शकत नाही, असे त्या शेतकऱ्यांनी सांगितले. ते दोन्ही शेतकरी त्या जखमी पाडसाला घेऊन तब्बल ४ तास अधिकाऱ्यांची वाट बघत बसले. त्यानंतर दुपारी पाऊणेतीन वाजण्याच्या सुमारास वनविभागाचे रामराव राठोड, संदीप ठाणके घटनास्थळी पोहोचले. त्यानंतर त्या जखमी पाडसाला उपचारासाठी परभणीकडे घेऊन गेले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा