परभणी/प्रतिनिधी ः कौसडी येथील महिला ग्रामसेविकेने ग्रामपंचायत कार्यालयाचे संयुक्त खाते न उघडता परस्पर स्वतःचे खाते काढून घेत कर्तव्यात कसुर केल्याचा आरोप झाला. तसेच यातून मोठी आर्थिक अनियमितता केल्याचे उघड झाल्याने मंगळवारी (दि.11) जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी बी.पी.पृथ्वीराज यांनी त्यांच्यावर निलंबनाची कार्यवाही केली आहे.
जिंतूर तालुक्यातील कौसडी येथील ग्रामपंचायत कार्यालयाला मिळणार्या विविध शासकीय योजनांच्या निधीसाठी ग्रामसेवक व सरपंच यांचे संयुक्त बँक खाते असणे बंधनकारक आहे. पण तेथील ग्रामसेविका ए.जी.गोरे यांनी तसे न करता केवळ स्वतःचे बँक खाते उघडल्याचे उघड झाले आहे. सदर खाते हे बोरी येथील महाराष्ट्र ग्रामीण बँक शाखेत उघडलेले आहे. या खात्यावर ग्रामपंचायतीला मिळणार्या विविध योजनांचा निधी वर्ग केलेला आहे. तो कोणालाही विचारात न घेता परस्पर उचलुन आर्थिक अनियममितता केल्याचे सीईओंच्या निदर्शनास तपासणीत स्पष्ट झाले आहे. या प्रकरणाची सर्व शहानिशा करण्यात आल्यानंतर ग्रामसेविका ए.जी.गोरे यांच्या कारभाराविषयी संशय निर्माण झाल्याने सीईओ बी.पी.पृथ्वीराज यांनी मंगळवारी त्यांच्यावर निलंबनाची कारवाई केली आहे. त्यात असे नमुद केले की,ग्रामसेविका गोरे यांना निलंबन कालावधीत परभणी येथील पंचायत समिती कार्यालय हे मुख्यालय म्हणून दिलेले आहे. तसेच त्या अर्धवेतनी रजेवर गेल्या असत्या तर त्यावेळी जेवढी रक्कम मिळाली असती तेवढी रक्कम निर्वाह भत्ता म्हणून त्यांना देण्यात येणार असल्याचेही नमुद केले आहे. एवढेच नाही तर महागाई भत्ता हा नियमाप्रमाणे निर्वाह भत्ता याप्रमाणे देण्यात येणार आहे. तसेच पुर्व परवानगीशिवाय दिलेले मुख्यालय त्यांनी सोडू नये असेही आदेशात म्हटले आहे. त्यांना या निलंबन आदेशात दिलेल्या कोणत्याही एका अटीचे उल्लंघन करता येणार नाही तसे झाल्यास दिला जाणारा निर्वाह भत्ता त्यांना मिळणार नाही असेही कळवले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा